

पंढरपूर ते लंडन व्हाया नागपूर सर्वात मोठी दिंडी निघणार
७० दिवस व २२ देशातून प्रवास, विष्णू मनोहर व मोहन पांडे भारतातील समन्वयक
अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात लंडन म्हणजेच युके येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्यदिव्य मंदिर साकारणार आहे.
त्यानिमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. 16 तारखेला ही दिंडी नागपुरात येत असून संध्याकाळी 5 वाजता विष्णू जी की रसोई, बजाज नगर येथे सर्वांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.
विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे नागपूरकर या मंदिराच्या समितीचे सदस्य असून भारतातील समन्वयक राहणार आहेत. निधी संकलन व भारतातील इतर तत्सम समन्वय संबंधित जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले, अमेरिका, यूरोप, लंडन येथे इस्कॉन, अक्षरधाम, बालाजी तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे अशी अनेक भारतीय मंदिरे बघायला मिळतात. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर तिकडे नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी लंडन येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील असून वारीला सातासमुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक ईच्छा आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी मोहन पांडे यांनी दिंडी यात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, खरे तर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात. पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात. ही बाब ध्यानात घेऊन वारीचा योजना करण्यात आली असून सुमारे २२ देशातून १८००० किलोमीटरचा ही दिंडी प्रवास करणार आहे आणि भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचवणार आहे.
दिनांक, १५ एप्रिल 2025 ला पंढरपूर येथून पादुका मार्गस्थ होणार आहे. 16 तारखेला त्या नागपुरात येतील. येथे सायंकाळी 5 वाजता विष्णू जी की रसोई येथे दर्शनासाठी ठेवण्यात येतील. नंतर त्या १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, यूरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवास करतील. या पादुका घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निमित्ताने बावीस देशातून वारीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुर्ण सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य उत्पात यांनी उत्तम नियोजन केले आहे.
या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटीचे विश्वनाथ कराड व वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिनी शुभेच्छा दिल्या असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यूके मधील ४८+ मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ संलग्न होत असून लवकरच भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे. तमीळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाविकही या निमित्ताने जोडले जात आहेत. या लोकांना मराठी भाषा येत नाही पण अभंग म्हणता येतात. महाराष्ट्र राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल जगभरात पोहोचणार आहे!
या शुभकार्यास विठ्ठल पाटील यांनी १ किलो चांदी देऊन आशीर्वाद दिले आहे व प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी पण संपुर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी युकेतीउल मॅंचेस्टर येथील प्रसिद्ध आयटी उद्योजक संग्राम वाघ, नागपुरातील पर्यावरण तज्ज्ञ व उद्योजक उत्कर्ष खोपकर, उद्योजक मिलींद देशकर, विजय जथे हे विशेष करून उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला विष्णू मनोहर, मोहन पांडे, संग्राम वाघ आणि विजय जथे यांची उपस्थिती होती.
अधिक माहितीसाठी संपर्क
Shree Vitthal Rukmini Temple UK (SVRTUK)
www.vitthalrukmini.org.uk
Temple@vitthalrukmini.org.uk
Tel: +44 20 3925 0925
Mob: +44 7768679194
+91 7057081313