World Cup-2023 भारतीय संघापुढे इतिहास घडविण्याचे आव्हान

0

मुंबई-विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. बाद फेरीतील भारताच्या अपयशाचा इतिहास लक्षात घेता उद्याच्या सामन्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची आशा क्रिकेट रसिक बाळगून आहेत. (World Cup-2023)
वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय संघ यंदा वर्ल्ड कप मिळवणार, असा ठाम विश्वास क्रिकेट रसिंकांना वाटत आहे. सर्वच आघाड्यांवर भारतीय संघ सरस ठरला असून हीच कामगिरी उपांत्य सामन्यात करुन दाखविण्याचे आव्हान भारतापुढे आहे. आकडेवारीनुसार, २०१४ ते २०२३ दरम्यान सध्याच्या विश्वचषकापूर्वी भारताने आयसीसीच्या ९ पैकी ८ स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठली आहे. मात्र, त्यांना एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र, त्यापूर्वीच्या २००७ ते २०१३ दरम्यान भारताने २००७च्या टी-२० विश्वचषक ते २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत आयसीसीच्या ७ स्पर्धांमध्ये भाग घेतला. यामध्ये टीम इंडियाने 3 स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठली आणि तिन्हीमध्ये विजेतेपद पटकावले होते. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील उपांत्य फेरीच्या सामन्यात १८ धावांनी पराभूत झाल्यावर भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले होते.
स्पर्धांमध्ये साखळी सामन्यांमध्ये भारताची कामगिरी अतिशय उत्तम राहिलेली आहे. पण, उपांत्य किंवा अंतिम फेरीत भारत मोठ्या फरकाने पराभूत होत असल्याचा इतिहास मागील १० वर्षांचा आहे. भारताने साखळीतील ८६ टक्के सामने जिंकले आहेत. त्याच वेळी भारतीय संघ 9 पैकी 8 स्पर्धांमध्ये बाद फेरीतून बाहेर पडला. याचा अर्थ, ८९ टक्के प्रसंगी, भारताला फक्त बाद फेरीत बाहेर व्हावे लागले आहे.