

27-28 मार्च 2025 रोजी सीआरएस निरीक्षण व वेग चाचणी
मध्य रेल्वे नागपूर विभागाने सेलो ते सिंदी (कि.मी. 772 – कि.मी. 790) दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. 18 किमी लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गामुळे रेल्वे वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, परिचालन क्षमता सुधारेल आणि प्रवासी तसेच मालगाड्यांच्या हालचाली अधिक सुकर होतील.
या संदर्भात, रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) 27 व 28 मार्च 2025 रोजी या नव्या रेल्वे मार्गाचे निरीक्षण व वेग चाचणी घेणार आहेत. या वेग चाचणीद्वारे नव्या रूळांच्या सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची तपासणी केली जाईल, तसेच ते सुरक्षित रेल्वे वाहतुकीच्या आवश्यक निकषांना पूरक आहेत की नाही, याची खातरजमा केली जाईल.
सर्व रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि रेल्वे मार्गाच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना या कालावधीत रेल्वे मार्ग ओलांडू नये तसेच सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या निरीक्षण प्रक्रियेस सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आवश्यक ती काळजी घेणार आहे.
या अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या पूर्णतेमुळे सध्याच्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक कमी होईल, विलंब कमी होतील आणि या परिसरातील रेल्वे सेवा अधिक सुकर होईल. नागपूर विभाग वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.