
– पुरस्कार राशी धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानला देणार
– ‘प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान
– वसंतराव नाईक प्रतिष्ठान व वनराई फाउंडेशनचे आयोजन
नागपूर(Nagpur), 1 जुलै-‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्यास त्याचे फळही चांगले, सुसंस्कारीत आणि विषमुक्त मिळते. त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावे व परसबागेत तयार झालेल्या विषमुक्त भाजांच्या माध्यमातून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रयोगशील शेती करणा-या सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी यांनी समस्त महिलांना केले.
वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त वतीने मंगळवारी सौ. कांचन गडकरी यांना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते ‘प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. 30 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. एनरीको हाइट्स कन्व्हेन्शन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते तर मंचावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरदराव गडाख, माजी आमदार व वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. निलय नाईक, सचिव प्रगती पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अजय पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
नितीनजींकडून मिळते मार्गदर्शन
धापेवाडा येथील शेतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विविध प्रयोग करण्याची संधी मिळत असल्याचे कांचनताई गडकरी म्हणाल्या. आईकडून शेतीचा वारसा, सासूकडून मिळालेली कुटुंबाची साथ, सहका-यांचे सहकार्य यासोबतच पाणी, मृदा आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यामुळे विविध प्रयोग करता आले व त्यात यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांना शेतीमधे विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने हा पुरस्कार स्वीकारल्याचे सांगत त्यांनी धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पुरस्काराची राशी प्रदान करण्यात येणार असल्याचे घोषणा केली.
शेतक-यांनी प्रेरणा घ्यावी – डॉ. सी. डी. मायी
कृषी क्षेत्रामध्ये हायब्रिड सारखे नवे तंत्रज्ञानसारखे देशात आणणा-या वसंतराव नाईक यांच्या नावाने दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी कांचनताईंची झालेली निवड अतिशय योग्य आहे. कांचनताईंनी धापेवाडा येथे केलेल्या प्रयोगांतून शेतक-यांनी प्रेरणा घेतली तर या पुरस्काराचे सार्थक होईल, असे डॉ. सी. डी. मायी म्हणाले.
गडकरी हे कृषीमंत्रीच – डॉ. शरदराव गडाख
नितीन गडकरी यांची ओळख जरी फ्लायओव्हर मंत्री अशी असली तरी ते ख-या अर्थाने ‘कृषीमंत्री’ आहेत. शेतीवर नितांत प्रेम असलेले गडकरी शेतीत नवनवे प्रयोग करतात व इतरांना दिशा देतात, असे सांगताना डॉ. शरदराव गडाख यांनी कांचनताईंनी नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात शेतीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. गिरीश गांधी यांनी कांचनताई गडकरी या महिला आणि शेतक-यांसाठी प्रेरणादायी उदाहरण असून नागपूर आणि विदर्भाला त्यांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रास्ताविकातून अॅड. निलय नाईक यांनी नितीन गडकरी व कांचनताई गडकरी यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव करताना या दाम्पत्याने वसंतराव नाईक साहेबांचा स्वप्नांची पूर्तता करण्याचे मोठे काम केल्याचे सांगितले. डॉ. अजय पाटील यांनी कांचनताई गडकरी यांचा परिचय करून दिला. कांचनताईंनी हा पुरस्कार स्वीकारल्यामुळे या पुरस्काराचा मान वाढला असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रगती पाटील यांनी केले तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. यावेळी कांचनताईच्या आई, मुलगी व सुना यांच्यासह अनिरूद्ध पाटील, हेमंत गांधी, प्रकाश इटनकर, आत्माराम नाईक, डॉ. सुजाता नाईक, सुनील राठोड, शुभांकर पाटील, इसरेल सेठ, दिपाली जाधव, अॅड. वनिता पवार, जयप्रकाश गुप्ता, अनुराधा राठोड, अरुणा जाधव, माधुरी मुंधडा, रुपाली जयस्वाल, चेतना कांबळे, राजश्री राठोड, नलिनी पवार, जयश्री राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
















