

पुणे (Pune), 6 जून : हगड रस्त्यावरील वडगाव (Vadgaon)येथील प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर आज सकाळी एका महिलेचा रेडी मिक्स सिमेंट टँकर खाली चिरडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धायरी आणि वडगावमध्ये सिमेंट काॅंक्रिट तयार करणारे सिमेंट प्लांट आहेत. या प्लांट मधून नेहमी भरधाव वेगाने मिक्स सिमेंट टँकर चालवले जातात.
बऱ्याचदा टँकर चालक मद्यपान करून टॅंकर चालवतात. त्यामुळे यापूर्वीही अपघात झाले आहेत.लांबट आकाराचा टॅंकर (एमएच १२ एस एक्स ९४६४) उताराच्या रस्त्यावरुन खाली जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून तो अचानक वळला असावा आणि अपघात असावा असा अंदाज आहे. अपघातानंतर चालक पळून गेला. बघ्यांची गर्दी होऊन त्यांनी पोलिसांना पाचारण केले.प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर टँकर किंवा ट्रक यावर निर्बंध आहेत. तरीही संबंधित टँकर मालक ते झुगारून देतात. अशा बेपर्वाईमुळे आज एका निष्पाप महिलेचा जागीच बळी गेला. स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे संताप असून रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.