

तळागाळातील लोकांसाठी अखंड कार्य करणार – पद्मश्री भिकुजी इदाते
धरमपेठ तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस साजरा
नागपूर, 5 ऑगस्ट
भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना चोर दरोडेखोर समजून त्यांच्यावर सतत अन्याय करण्यात आला पण, छत्रपती शिवराय, राणाप्रताप यांनी या समाजाला सोबत घेऊन राष्ट्रकार्य केले. या समाजासोबत तळागाळातील लोकांसाठी माझे कार्य अखंड सुरू राहील, असे मनोगत पद्मश्री भिकुजी इदाते यांनी व्यक्त केले.
धरमपेठ तंत्रनिकेतन येथे धरमपेठ शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस “सामाजिक जाणिव दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पद्मश्री भिकुजी इदाते यांच्यासह धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, धरमपेठ तंत्रनिकेतनचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास देशपांडे यांनी केले. काही विद्यार्थ्यांनी “मतदान का आवश्यक आहे’ आणि ” जंकफूड आणि आरोग्य’ या सामाजिक विषयांवर मनोगत व्यक्त केले. उल्हास औरंगाबादकर यांनी “समाजाप्रती प्रत्येकाचे काही देणे लागते ही जाणीव सर्वाना व्हावी हेच या कार्यक्रमाचे प्रयोजन आहे’ असे सांगितले.
सामाजिक जाणिव दिवसाचे औचित्य साधून ” संवेदना’ या स्वमग्न मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका कांचन फडके यांचा सत्कार करण्यात आला आणि महाविद्यालयाकडून संस्थेला देणगीही देण्यात आली. सूत्रसंचालन विनय मोडक यांनी तर आभार प्रदर्शन धरमपेठ तंत्रनिकेतनच्या प्राचार्या मीता कळाशिकर यांनी केले. सौ. खंडागळे यांनी पसायदान सादर केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण होउन या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.