
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter Session Maharashtra) प्राथमिक वेळापत्रक जाहीर झाले असून ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन अवघ्या १० दिवसांत गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साधारणपणे आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी अधिवेशनाचे सुप वाजते. मात्र, यावेळी ते बुधवारीच (20 डिसेंबर) गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Assembly Winter Session 2023)
७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज २० डिसेंबरपर्यंतच कामकाज दाखविण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विदर्भातील हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे, असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर करारप्रमाणे चालवले पाहिजे. हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे. हिवाळी अधिवेशनापर्यंत काय काय खेळ होतात ते पाहिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत, ते यांनी समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.