

अकोला लोकसभा मतदारसंघ
नागपूर (Nagpur ): (शंखनाद चमू) वाढत्या उन्हासोबतच दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम विदर्भात राजकीय वातावरण तापले आहे .या जागेसाठी भाजपा ,काँग्रेस महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा परंपरागत तिरंगी लढतीत भाजपचे कमळ फुलणार का, हा खरा प्रश्न आहे
अकोला लोकसभा मतदार संघात भाजपाकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे ,महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ .अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर या तीनही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले .भाजपाचे अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले.वंचित बहुजन आघाडीने शक्ती प्रदर्शन करत करत जनतेचे लक्ष वेधून घेतले.यावेळी अँड .आंबेडकर यांनी विजय खेचून आणण्याची जिद्द ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले .
महाविकास आघाडीची भव्य सभा कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. यावेळी पटोले यांनी भाजपावर सडकून टीका केली. तुल्यबळ उमेदवारांच्या संभाव्य समीकरणांची बेरीज वजाबाकी त्यांच्या समर्थकांकडून बोलताना मांडल्या जात आहे. भाजपाने खासदार पुत्रालाच उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर पुढे आला, तो कायम राहील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुसरीकडे मोदी यांना पंतप्रधान करा या ध्येयाने प्रेरित प्रचारात महायुतीची आघाडी दिसत असली तरी काँग्रेसचे डॉ अभय पाटील यांचीही उमेदवारी परिवर्तनाच्या दिशेने भक्कम दिसत आहे. दुसरीकडे वंचितचा अकोला पॅटर्न या वेळेस तरी यशस्वी ठरणार का ? याविषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.