Sokoli : पुन्हा हात जिंकणार की टिकटिक करत कमळ फुलणार ?

0

साकोली (Sokoli) :
सोमदत्तच्या कढईची युती आघाडीला आडकाठी; वंचितसह बसपाचाही बोलबाला

भंडारा (Bhandara) : जिल्ह्यातील भंडारा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ वगळता उर्वरित साकोली व तुमसर विधानसभा मतदारसंच खुल्या प्रवर्गासाठी आहेत. साकोली आणि तुमसर विधानसभा मतदारसंघाची जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा आहे. साकोलीमधून सलग दुसऱ्यांदा विजयश्री हस्तगत करण्यासाठी काँग्रेसच्या हात चिन्हावर नाना पटोले यांनी जोर लावला आहे. तर माजी आमदार बाळा काशीवार, अॅड. वसंत एंचिलवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, विजया नंदूरकर, सोमदक्क करंजेकर यांना डावलून राष्ट्रवादीकडून उमेदवार आयात करून भाजपने अविनाश ब्राम्हणकर यांच्यावर साकोलीचा गड पुन्हा खेचून आणण्याची जबाबदारी टाकली आहे. भाजप बंडखोर सोमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत भाजप असंतुष्टांचा आधार घेत यंदाच्या निवडणुकीत विजय मिळविणार, असा निर्धार केला आहे. त्यामुळे यंदा हात जिंकणार की टिकटिक करत कमळ फुलणार ? याबदलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अपक्ष सोमदत्त करंजेकर यांनी आपणच खऱ्या भाजपचे निष्ठावंत उमेदवार असल्याचा दावा केल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे आव्हान महायुतीच्या शीर्षस्थ नेतेमंडळींसमोर उभे ठाकले आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नाना पटोले यांना विधानसभेत पाठवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनविण्याच्या उद्देशाने काँग्रेसचा कार्यकर्ता जोमाने कामाला लागला असून मागील पंचविस वर्षात क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या कामांमुळे मतदारसंघात पटोले यांचाच बोलबाला सुरु आहे. एकेकाळी भाजपची सत्ता असलेल्या साकोली विधानसभेत महायुतीकडून भाजपने आयात उमेदवारावर आपला डाव खेळल्याने पुढील काळात सत्तेचं समीकरणात मतदारसंघच नव्हेतर भंडारा जिल्हा भाजपमुक्त होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, पटोले यांना पाडायचे असेल तर कुणबी उमेदवार द्यायचा हे समीकरण भाजपवर उलटू शकते. कारण स्थानिक भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी असताना यांनी राष्ट्रवादीतून उमेदवार आयात केला. त्यामुळे साकोलीमधले मोठे भाजप नेते आणि पदाधिकारी दुखावले आहेत. याचा फटका भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना बसून त्याचा फायदा नाना पटोले यांना होऊ शकतो, असे राजकीय पंडितांचे मत आहे.

या मतदारसंघात नाना पटोले, सोमदत्त करंजेकर आणि अविनाश ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आता या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर भाजपने आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी केली. भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार हे उघडपणे भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. तसेच सोमदत्त करंजेकर यांचे वडील ब्रह्मानंद करंजेकर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क आहे. दुसरीकडे अविनाश ब्राह्मणकर हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचं फारसे वलय दिसत नाही. ते प्रफुल पटेलांचे कार्यकर्ते आहेत. सध्याच्या परिस्थितीत सोमदत्त करंजेकर या अपक्ष उमेदवाराची बाजू भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यापेक्षा वरचढ दिसते, असे इथले स्थानिक पत्रकार सांगतात.

विशेष म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर हे तीन तालुके येतात. गेल्या काही विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मतदारसंघात दर दोन टर्मनंतर इथे मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात. कधी दोन टर्म काँग्रेस तर कधी दोन टर्म भाजप असे इथले आतापर्यंतच राजकीय समीकरण दिसते. गेल्या २००९ पासून इथे भाजपचा वरचष्मा दिसतोय. काँग्रेसच्या नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करून इथून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि नाना पटोले विजयीही झाले होते. त्यानंतर २०१४ ला नाना पटोले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले आणि भाजपचे बाळा काशीवार आमदार झाले. पण, पटोलेंचे मन भाजपात रमले नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली. पटोलेंनी २०१९ मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने ते भाजपच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे पटोलेंना साकोलीत गाठण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास मर्जीतल्या परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. यावेळी ही लढत स्थानिक विरुद्ध आयात अशी झाली होती.

फुके नागपुरातून आयात केलेले उमेदवार आहेत, असा प्रचार नाना पटोलेंनी केला होता. इथे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे वंचितचे उमेदवार होते त्यांना तब्बल ३४,४३६ मतं मिळाली होती. तरीही नाना पटोलेंचा ६ हजार २४० मतांनी विजय झाला होता. अविनाश ब्राह्मणकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून आयात केलेले उमेदवार आहेत. इथे भाजपचे नेते इच्छूक होते. त्यांनी तयारीही केली होती. पण, ऐनवेळी अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले. पक्षात उमेदवार असताना बाहेरून आयात करायची काय गरज होती, अशी नाराजी इथले भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या अधिकृत उमेदवाराचे किती काम करतात यावर बरेच गणित अवलंबून आहे.

पटोलेंविरोधात भाजपने दिला कुणबी उमेदवार

गेल्या पाच वर्षात नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. तिथून राजीनामा देऊन त्यांना थेट महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. पटोलेंचे राजकीय महत्त्व वाढतच गेले. काही दिवसांपूर्वीच विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे जास्त आमदार आले तर नाना पटोले मुख्यमंत्री होतील असे बोलून दाखवले होते. साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे. पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यात अद्याप भाजपला यश आले नाही. नाना पटोले यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात भाजपला सुरुवातीला तुळ्यबळ उमेदवार सापडत नव्हता. यावेळी पटोलेंना साकोलीत गाठायचे असेल तर बाहेरचा उमेदवार न आणता स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना होती. भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार आणि सोमदत्त करंजेकर यांनी या मतदारसंघात तयारीही केली होती. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण, अखेर राष्ट्रवादीतून आयात करून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली. अविनाश ब्राह्मणकर हे कुणबी असून ते प्रफुल पटेलांचे कार्यकर्ते आहेत.

जातीय समीकरणाचा फायदा कोणाला?

साकोली विधानसभा क्षेत्रात विकास, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. पण, आतापर्यंत या मुद्द्यांचा निवडणूक निकालावर थेट परिणाम झाल्याचं दिसलं नाही. इथल्या निकालावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते इथलं जातीय समीकरण. सर्वाधिक मतदार कुणबी आहेत. त्यानंतर तेली आणि दलित समाजाची मतं या मतदारसंघात आहेत. कुणबी आणि दलित मतांमुळे नाना पटोले या मतदारसंघातून निवडून येतात. तसेच लोकसभेलाही या मतांचा फायदा होत पडोळे खासदार झाले. नाना पटोलेंना कुणबी आणि स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो हा विचार करत भाजपने राष्ट्रवादीच्या अविनाश ब्राह्मणकरांना आयात करत उमेदवारी दिली. त्यामुळे आता कुणबी मत विभाजित होण्याची शक्यता आहे. पण, जवळपास सर्वच मतदारसंघात तेली मतांचा ओढा हा भाजपकडे असतो. पण, या मतदारसंघातली तेली मते यावेळी भाजपचे अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे विभाजीत होण्याची भीती आहे. त्याचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.

दुसरे म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघात दलित उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी इथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केली होती. पण, काँग्रेसने पूजा ठवकर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला पसंती दिली. त्यामुळे इथल्या काँग्रेस नेत्यांसह बौद्ध समाजाने नाराजी बोलून दाखवली होती. त्यांनी यावेळी साकोली विधानसभा क्षेत्रातलं समीकरण बिघडवण्याचा इशाराही दिला होता. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने इथल्या बौद्ध समाजाच्या नाराजीची झळ साकोलीपर्यंत पोहोचून त्याचा फटका पटोलेंना बसण्याचीही शक्यता असल्याचे बोलले जात आहे.