
रस्ता दुभाजकाची जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
चंद्रपूर :मनपा आयुक्त विद्या गायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखी पत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही. घामाच्या पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना विकास कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे.परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला सडेतोड उत्तर देण्यात येईल. या मुजोर अधिकाऱ्यांना योग्य वेळी हिशेब द्यावा लागेल.प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याची फाईल आपल्याकडे तयार आहे. कोणीही सुटणार नाही असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला.
मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांना पुराव्यासह तक्रार देऊनही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही. शासन-प्रशासनाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही काढत नाही. त्यांचे या सर्व भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
दरम्यान वादग्रस्त रस्ता दुभाजकातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. कारण नसतांना जुने मजबूत रस्ता दुभाजक तोडण्यात आले. निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार मनपाचे एक कोटी रुपयांचे नुकसान केले.
तोडण्याच्या खर्चासह जुन्या दुभाजकाच्या कामाचा तसेच नविन दुभाजक तयार करण्याचा खर्च या प्रकरणातील संबंधित अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल व तत्कालीन शहर अभियंता विजय बोरीकर, भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,विद्यमान शहर अभियंता रवी हजारे,उपअभियंता आशिष भारती, सहाय्यक अभियंता प्रतीक्षा जनबंधू व कंत्राटदार मे. सूर्यवंशी एंटरप्राईजेस यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांचे विरुद्ध चौकशी करून शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

















