पुणे-बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा असून ही चर्चा त्यांच्याच एका वक्तव्याने निर्माण झाली आहे. नाना पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. (Actor Nana Patekar to Contest Election) पाटेकर यांनी अजित पवार यांच्याकडे खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना पाटेकर यांचे सिंहगडजवळ फार्महाऊस आहे व त्यांचा मुक्काम बराच काळ खडकवासला येथे असतो. येथूनच ते निवडणूक लढवितील, अशी चर्चा सुरु आहे. अलिकडेच पाटेकर यांनी एका वाहिनीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी समोर कुणीच नसल्याचे विधान नाना पाटेकर यांनी केले होते. मोठ्या संख्येने भाजपच निवडून येणार, असे भाकितही नाना यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणात येण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
















