

नागपूर लोकसभा मतदारसंघ
नागपूर (Nagpur) :(शंखनाद चमू )लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नागपुरात केंद्रीय महामार्ग मंत्री, भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी ही निवडणूक भाजप महायुतीने लक्षवेधी केल्याचे हायटेक प्रचारात जाणवत आहे.भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या 195 जणांच्या यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू होते. मात्र , भाजपच्या दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव जाहीर झाले.
काँग्रेसकडून शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे गडकरी यांच्याशी दोन हात करणार आहेत. कधी नव्हे, ते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ नितीन राऊत उमेदवारी ठरविण्यापासून तर प्रचारात एकदिलाने कामाला लागल्याचे चित्र आहे. मी 5 लाख मतांनी निवडून येणार असा विश्वास गडकरी व्यक्त करीत आहेत.
काँग्रेसने 13 वेळा हा मतदारसंघ काबीज केला, भाजपला केवळ तीनदा हा मतदारसंघ जिंकता आला. यात रामजन्मभूमी आंदोलनाच्या नावावर काँग्रेसचा राजीनामा देत भाजपकडून लढलेले बनवारीलाल पुरोहित यांनी पहिल्यांदा भाजपसाठी विजय मिळविला होता. तर गत दोन निवडणुकीत गडकरींनी विजय मिळविला. 2014 ला माजी केंद्रीय मंत्री व या मतदारसंघात तीनदा विजय मिळविणारे विलास मुत्तेमवार यांचा तर 2019 साली नाना पटोले यांचा गडकरींनी पराभव केला. गेल्यावेळी पटोलेना वेळेवर उमेदवारी मिळूनही साडेचार लाख मते घेतली होती.
यावेळी गडकरी पायाभूत सुविधा व विकासाच्या नावावर हमखास जिंकणार असे चित्र असले तरी 5 लाख मतांनी जिंकणार का,हा प्रश्न चर्चेत आहे. गेल्यावेळी 54 टक्के मतदानाचा फटका बसून मताधिक्य कमी झालेल्या गडकरी यांना यंदा 5 लाखांचे मताधिक्य मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. शहरातील सहापैकी दोन विधानसभा काँग्रेस तर चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. नागपुरात आमदार विकास ठाकरे यांचे विविध भागात संघटन आहे. बूथ, ब्लॉक पातळीवर त्यांच्या या नेटवर्कचा पक्षाला फायदा मिळू शकतो. भाजप विरोधात असलेल्या नाराजीचा काँग्रेसला फायदा मिळू शकतो.
एकीकडे मी पोस्टर,बॅनर लावणार नाही अशी भाषा बोलणारे नितीन गडकरी सध्या सकाळपासून प्रचारात गुंतले आहेत. विकास कामांच्या भरवशावर ते निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, लोकशाही संरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे , मी जिंकणारच असा दावा काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठींबा दिला आहे हे विशेष. त्यामुळे भाजपाविरोधी मतांचे विभाजन कसे घडून येते, यावरही मताधिक्य ठरणार आहे.