झारखंडमध्ये बिहारची पुनरावृत्ती होणार?

0

रांची-नव्वदच्या दशकात बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री Lalu Prasad Yadav लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागल्यावर सरकार आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनवले होते. तशाच घटनाक्रमाची पुनरावृत्ती आता झारखंडमध्येही होण्याची शक्यता दिसत आहे. भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना सोरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची गादी सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Jharkhand Mukti Morcha)

सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदचे संयुक्त सरकार आहे. या सरकारवर टांगती तलवार लटकत आहे. तब्बल ३० तास बेपत्ता राहिल्यावर हेमंत सोरेने राचीत परतले व त्यांनी सीएम हाऊसमध्ये महाआघाडीच्या (जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी) आमदारांची बैठक घेतली. यानंतर कल्पना सोरेन यांच्याकडे गादी सोपवण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सध्या सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यावरील गंभीर आरोप लक्षात घेता त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. हेमंत सोरेन यांच्या चौकशीपूर्वीच सत्ताधारी महाआघाडीचे आमदार रांचीत पोहोचले आहेत. ते राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे ४८ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाकडे २९, काँग्रेसकडे १७ आणि राजद व सीपीआयएमएलकडे प्रत्येकी एक आमदार आहे. विरोधी पक्ष एनडीएकडे ३२ आमदार आहेत. यामध्ये भाजपकडे २६ आमदार आहेत. दरम्यान, काँग्रेसने कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या अफवा असल्याचा दावा केलाय. कल्पना सोरेन यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमीच्या नाही. कल्पना सोरेन मूळच्या ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील असून २००६ मध्ये त्याचा हेमंत सोरेन यांच्याशी विवाह झाला आहे. कल्पना सोरेन या व्यवसाय आणि समाजकार्यात गुंतलेल्या आहेत. त्या एक शाळा चालवतात आणि सेंद्रिय शेतीमध्ये त्यांना रस आहे. त्यांनी इंजिनीअरिंग आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान, कल्पना सोरेन यांची चर्चा सुरु झाल्यावर हेमंत सोरेन यांचा भाऊ वसंत सोरेन यांनी या प्रस्तावाला विरोध केला असल्याची माहिती आहे. कौटुंबिक मतभेदांमुळे असा निर्णय जड जाईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.