

मराठीच्या अभिजात दर्जाच्या खेळखंडोबासाठी आपण सारेच सारखेच जबाबदार
मराठी राज्यातच आज मराठीसमोर कधी
नव्हे एवढी आव्हाने उभी आहेत,मात्र आपले तथाकथित लेखक,कलावंत,बुद्धिवंत, विचारवंत, उच्च शिक्षित, व्यावसायिक इ.त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत ते सोडवण्याची त्यांची जबाबदारी मात्र टाळत आहेत,उलट ती जबाबदारी घेणारे तळमळीने सरकारला जाब विचारत असतांना,सरकारला खडे बोल सुनावणे याला फॅशन संबोधत आहेत,हे चित्र दक्षिणेतील भाषिक समाजात नाही त्यामुळेच त्यांना अभिजात दर्जा मिळतो आणि मराठीला तो गेली दहा देण्याचे टाळण्याची हिंमत केंद्र सरकार करू शकते,अशा आशयाचे उद्गार प्रख्यात ज्येष्ठ कवी, साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष व मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ‘ मराठीच्या अभिजात दर्जाचा खेळखंडोबा ‘ या विषयावर बोलताना काढले.
विश्व मराठी परिषदेने त्यांच्या या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते.
मराठीची अवहेलना आणि दुरवस्था यासाठी केवळ राज्यकर्त्यानाच तेवढा दोष देऊन चालणार नाही कारण ते देखील स्वभाषेबद्दल घोर उदासीन असलेल्या मराठी भाषिक समाजाचाच भाग आहेत, भाषेचे शिक्षणच न देता भाषेच्या नावावर केवळ साहित्याचे शिक्षण देण्याचा व भाषिक, सांस्कृतिक आत्मसन्मान चळवळच मराठीने न उभारण्याचाही हा परिणाम आहे असे डॉ जोशी म्हणाले.
अभिजात दर्जा म्हणजे अभिजनांचा वा त्यांच्या भाषिक रूपाचा दर्जा नव्हे तर २५०० वर्षांच्या मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांच्या मराठी भाषेला,संतांनी भाषिक बंड करून तिच्या मूळ प्राकृत रूपाला दिलेल्या प्रतिष्ठेला भारत सरकारची अभिजात म्हणून मान्यता मिळवणे होय हे समजून घेतले पाहिजे असे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले.या प्रकरणी केंद्र सरकार, साहित्य अकादमी, संस्कृती मंत्रालय, संबंधित मंत्री,हे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणारे नेते हे
सारे मिळून मराठी भाषिक समाजाची केवळ दिशाभूल करत असून केंद्र सरकारने १२ कोटी मराठी भाषिकांच्या अस्मितेशी व भावनांशी खेळू नये असेही डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले.
कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आजवर या संबंधी तोंड उघडले नव्हते मात्र रमेश जयराम या काॅंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी त्यांच्या पक्षामार्फत नुकतेच व प्रथमच मराठीला अभिजात दर्जा का दिला नाही असा थेट प्रश्न विचारत त्यांची आघाडी सत्तेवर आल्यास सरकार स्थापन होताच तो दिला जाईल हे जे वचन दिले त्याबद्दल मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आम्ही त्यांचे आभार मानले आहेत कारण आमच्या या पाठपुराव्याच्या प्रवासातला हा अतिशय महत्वाचा टप्पा त्यामुळे गाठला गेला आहे असेही डॉ जोशी म्हणाले.
मराठी बाबत पक्षीय जाहीरनाम्यात
नि:संदिग्ध शब्दात अभिवचने देणार
नाहीत त्यांना मतदान करू नये असे जे आवाहन केले गेले होते त्याचेही त्यांनी स्मरण करून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुळकर्णी हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिकेत पाटील यांनी केले.
————————————————-
कृपया प्रसिद्धीसाठी