
मुंबई-शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्यात मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून सुरु झालेला वाद आता चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावण्याच्या पातळीवर पोहोचला आहे. कीर्तिकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचे आरोप लावल्यावर कदम यांनी आता कीतिकरांचे व्यक्तिगत चारित्र काढून गंभीर आरोप केले आहेत. खासदार कीर्तिकरांनी त्यांच्या पत्नीशी गद्दारी केली असून ते शेण खायला पुण्यात जातात, आरोप कदमांनी केल्याने खळबळ माजली आहे. (Ramdas Kadam and Gajanan Kirtikar)
मागील काही दिवसांपासून कदम आणि कीर्तिकरांमध्ये हा वाद सुरु आहे. कीर्तिकर यांनी यंदा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केल्यावर कदमांनी आपल्या मुलाला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यातून हा वाद सुरु झाला व कीर्तिकरांनी कदमांवर गद्दारी केल्याचे आरोप लावले. कीर्तिकरांच्या या आरोपांमुळे दुखावलेल्या कदम यांनी आता थेट कीर्तिकरांचं खासगी आयुष्य काढले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कदम म्हणाले की, मी कधीही गद्दारी केलेली नाही. उलट कीर्तिकरांनी त्यांच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला पुण्याला जातात, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. तुमचे वस्त्रहरण करायला लावू नका. तुम्ही खरे कोण आहात, हे मला बोलायला लावू नका. तुमची अडचण होईल. माझ्या नादाला लागू नका. वस्त्रहरण केलं तर महिला सुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत, असे ते म्हणाले.