

धुळे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना फसवलं की ओबीसींना फसवलं.? हेच कळायला मार्ग नाही, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण देताना ओबीसींचा धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण कसे दिले. सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते सुद्धा दिलेले नाही, राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की, ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा तसेच जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून राहिली असून, एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी कायम आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.