यवतमाळ – यवतमाळमध्ये आज मूर्तिकारांनी अनोखे आंदोलन केले. गणपती बाप्पाच्या मूर्ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले. आम्ही मोठ्या मेहनतीने गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार केल्या. मात्र पुन्हा एकदा पीओपीच्या मुर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. खरंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. मात्र यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन कुठेही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे यवतमाळच्या मूर्तीकरांनी गणपती बाप्पाच्या मुर्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवल्या आहेत. मातीच्या मूर्ती तयार केल्या मात्र त्या विकल्या गेल्या नाही त्यामुळे आर्थिक फटका बसलाय. हा सर्व फटका प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे बसलाय, असे म्हणत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या झालेल्या तोट्याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील मूर्तिकारांनी केली आहे.














