शिवसेना कुणाची?.. ठाकरे, शिंदे गटांकडून लेखी युक्तिवाद सादर, फैसला पुढच्या आठवड्यात?

0

नवी दिल्लीः शिवसेना पक्ष नेमका कोणाचा?, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे, या प्रश्नाचे उत्तर कदाचित पुढच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांकडून आयोगाला लेखी युक्तिवाद सादर करण्यात आले (Election Commission of India) आहेत. आपल्या लेखी युक्तिवादात ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे बंड केले, याची माहिती देण्यात आली आहे. सिंदे यांचे पद घटनात्मक नसून निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आलीय. तर दुसरीकडे मूळ पक्ष आम्हीच असल्याचा पुनरूच्चार शिंदे गटाकडून करण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांची निवड लोकशाही पद्धतीने झाली असल्याने त्यांचे पद घटनात्मक आहे. शिंदे गटाकडे पक्ष लोकप्रतिनिधींचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे पक्ष कोणाचा याचा निर्णय घेताना आयोगाने बहुमत, संख्याबळ विचारात घ्यावे, धनुष्यबाण चिन्हासाठी आम्ही सर्व पुराव्याची पुर्तता केली असून आम्हालाच हे चिन्ह मिळावे, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आलीय.

मागील सुनावणीत ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आधी आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्या व त्यानंतरच निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षचिन्ह कुणाचे? याबाबत फैसला द्यावा, असा युक्तिवाद केला होता.

आम्हीच जिंकणार-अरविंद सावंत

दरम्यान, आम्ही सर्व पुरावे, प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले आहेत. आमदार गेले म्हणून पक्षावर हक्क सांगता येत नाही. त्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.