रामटेकचा गड कोण राखणार, शिवसेना की काँग्रेस?

0

लोकसभा रणधुमाळी मतदारसंघ -रामटेक

नागपूर (Nagpur) – शंखनाद चमू नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात सध्या रामटेकचा गड शिवसेनेचा की काँग्रेसचा, यावर चर्चा जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या सभेनंतर हा मतदारसंघ महायुतीला अधिक सोपा झाल्याचे बोलले जात आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे तीन दिवस तळ ठोकून होते. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवार करण्याचे धोरण स्वीकारले असले तरी शिवसेनेतील उठाव होत असताना, मुख्यमंत्री शिंदे यांची साथ देणाऱ्या, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करीत दोनदा विजयी झालेल्या खा. कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्याने शिवसेना रामटेकचा गड राखणार का, हा खरा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांची उमेदवारी जात पडताळणीत रद्द झाल्याने त्यांचे पती श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. मात्र, बर्वे यांना न्यायालयीन लढाईत आलेले अपयश लक्षात घेता या मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार विरुद्ध महायुतीचा उमेदवार किंबहुना भाजप असेच चित्र आहे. सुरुवातीला भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला, प्रचार सुरू केला. नंतर शिवसेनेने हा मतदारसंघ ठेवावा पण जनतेत नाराजी असल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्या, अशी मागणी भाजपने पुढे केली. दरम्यान,आ राजू पारवे यांना तिकीट देण्यावरून शिंदे गटात तसेच भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाली. एकंदरीत नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघावरून दोन्हीकडे नाराजी आहे. सर्व खासदारांना तिकीट मिळणारच, कामाला लागा असे आश्वासन दिल्याने तुमाने निश्चिंत होते. मात्र,त्यांचा अपेक्षाभंग झाला. भाजपकडे माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये असे प्रबळ दावेदार असताना भाजपने शिवसेनेला बाहेरचा उमेदवार का दिला, यावरून अंतर्गत धुसफूस निर्माण झाली आहे.

शिवसेना जिल्हा संघटक अमोल गुजर यांनी पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला, पण त्यालाही उशीर झाला. खासदार कृपाल तुमाने गट उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात कमी पडला. पूर्व विदर्भात भाजपने 4 उमेदवार कायम ठेवले असताना ते हॅट्ट्रिकपासून वंचित राहिले. इतरांनाच तिकीट दिले जाताना आपल्या निष्ठावंतांचे काय, असा प्रश्न आता भाजपातूनही पुढे केला जात आहे. अर्थातच कधीकाळी देशाचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी नेतृत्व केलेल्या, 1943 गावांचा समावेश असलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघात सर्व असंतुष्टांना कामाला लावण्याचे आव्हान शिंदे गट आणि भाजपपुढे शेवटच्या टप्प्यात असणार आहे.

गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यंदा अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्यावर रिंगणात कायम असल्याने काँग्रेसचेच उमेदवार आमने -सामने उभे ठाकल्याने बर्वे यांच्या निमित्ताने माजी मंत्री सुनील केदार आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule)यांची कसोटी या लढतीत लागणार आहे हे निश्चित.