

साहित्य हा एकुणच सामाज जीवनाचा आरसा मानला जातो. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण , पश्चिम महाराष्ट्र या विविधतेनी महाराष्ट्र सुसंपन्न आकारास आला. या विविधतेला एकात्मरुप म्हणून महाराष्ट्र संस्कृती, महाराष्ट्र साहित्य म्हणून पाहत असतांना त्याला गौरवान्वीत करण्यात विदर्भाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. पांढऱ्या सोन्यांनी , काळ्या मातीतल्या मोत्यांनी सजणारे , माणसाचे गीत गाणारे आणि ‘वसंत’ प्रमाणे बहरणारे शब्दधन हे वैदर्भीय साहित्याचे जणू वैशिष्ट्यच. या वैदर्भीय साहित्याचा पताका राजधानी मुंबईतही फडकावा, या उदात्त हेतूने महानायक वसंतराव नाईक , मारोतराव कन्नमवार, ग.त्र्य.माडखोलकर आणि जलनायक सुधाकरराव नाईक या विदर्भरत्नानी पुढाकार घेतला होता. विदर्भाचा जोडणारा दुवा तयार व्हावा यासाठी ‘विदर्भ साहित्य भवन’ निर्मितीसाठी हालचाली करण्यात आली. या संदर्भात सभाही घेण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावे आणि विदर्भ साहित्य भवनच्या जागेसाठी राज्य सरकारला विनंती करावी असे ठरवण्यात आले, तत्कालीन सरकारने यासाठी वरळी येथे जागा देण्याबाबत हालचाली करण्यात आली, परंतु निरंतर पाठपुरावा अभावी त्याला मुर्त रुप आले नाही.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा हरितक्रांतीचे जनक वसंंतराव नाईक सरकारने विदर्भ साहित्य भवन उभारण्याच्या या संकल्पाला खऱ्याअर्थाने गती दिली. १९६९ मध्ये वस़तराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ‘विदर्भ प्रगती ट्रस्ट’ देखील स्थापन करण्यात आले, त्यामध्ये नाईक सरकारच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री बॅ.शेषराव वानखेडे , नरेंद्र तिडके , बाळासाहेब तिरपुडे आणि मधुसुदन वैराळे हे या ट्रस्टचे सदस्य होते.
वैदर्भीयांसाठी मुंबईत हक्काचा भवन असावा हे यामागील उद्देश होते, महत्वाचे म्हणजे यात व्यापक भूमिका घेण्यात आली. वैदर्भीय ग्रंथ , वैदर्भीय लेखकाचे साहित्य , इतर मराठी व बोलीभाषेतील साहित्याचे ग्रंथालय व्हावे. वैदर्भीय लोकसंस्कृती , विदर्भातील विविध बोलीभाषाचे संवर्धन आणि साहित्य निर्मितीला चालना देणे, त्यासाठी उपक्रम हाती घेणे. महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क वृद्धिंगत करावा असे उद्देश ठरविण्यात आले होते.
विदर्भ साहित्य भवनसाठी हालचाली करीत असतांनाच पुढे राज्यात भिषण दुष्काळ , अन्नधान्याच्या टंचाई असे अनेक नैसर्गिक संकटे आली, राज्याला या संकटातून सावरण्यासाठी तसेच विशेषतः शेती, उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महानायक वसंंतराव नाईक यांनी स्वतः ला झोकून दिले होते. या जडणघडणीतील कमालीच्या व्यस्ततेमुळे तसेच विदर्भ भवनसाठी निरंतर पाठपुरावा न झाल्यामुळे विदर्भ साहित्य भवनाचा आराखडा पुढे सरकला नाही. साहित्य क्षेत्रात यशवंतराव चव्हाणाप्रमाणेच सुधाकरराव नाईकांना देखील कमालीची आस्था होती. यवतमाळ येथे त्यांच्या पुढाकारातून अ.भा.साहित्य संमेलन संपन्न झाले होते. त्यांच्याही मुख्यमंत्री कार्यकाळात देखील विदर्भ साहित्य भवनासाठीचा पाठपुरावा न झाल्यामुळे ते स्वप्न साकारले गेले नाहीत. विदर्भ साहित्य संघाच्या शतकमहोत्सवी वर्षात यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक , मारोतराव कन्नमवार , सुधाकरराव नाईक , ग.त्र्य.माडखोलकर , सुमती धनवटे , द.ग.गोडसे , बॅ.शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके , बाळासाहेब तिरपुडे या वैदर्भीय रत्नांनी पाहिलेल्या स्वप्नाला वर्तमान वैदर्भीय नेतृत्व मुर्तरुप देतील, अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात मिळाला. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या बाबतीत वैदर्भीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. शिवाय रामटेक येथे संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात झाला. मराठी राजभाषेच्या संवर्धन आणि तिच्या समृद्धीसाठी वर्तमान काळात पोटतिडकीने ज्येष्ठ वैदर्भीय साहित्यिक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी आणि अन्य काही साहित्यप्रेमी प्रयत्न करतांना दिसुन येते. तात्पर्य भाषा , साहित्य क्षेत्रातही वैदर्भीय नेत्यांचे, साहित्यिकांचे मोठे योगदान राहिले आहे, ही सकारात्मकता लक्षात घेता मुंबईत वैदर्भीय साहित्य भवन , वैदर्भीय साहित्य केंद्र साकारुन वैदर्भीय साहित्याला ज्ञानसाहित्य म्हणून गती द्यायला हवी, अशी वैदर्भीय साहित्य प्रज्ञावंत आणि रसिकांची अपेक्षा आहे.