…काय खासदार ! …आनंद देणारी हाक

0

ठाणे (thane) :- ठाण्याच्या आनंद नगर विभागात लहानाचा मोठा झालो ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकलो विद्यार्थी चळवळीत काम केले… हा सगळा काळ संघर्षाचा होता.. या संघर्षातून उभे राहण्याचे बळ वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिले… माझ्यासाठी ज्यांचा शब्द प्रमाण असतो असे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाठीशी उभे राहिले आणि सामान्य कुटुंबातला संघर्ष करणारा नरेश म्हस्के नावाचा कार्यकर्ता खासदार झाला. संसदेच्या संयुक्त सभागृहात आज खासदार म्हणून बसलो, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या विश्वविक्रमी नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पाहिले…त्यावेळी संघर्षाचा मोठा एक पट माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि तो अत्यंत भावूक करणारा होता.

हे सारं ज्यांच्यामुळे शक्य झाले ते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आज सभागृहात आले आणि त्यांनी मला ‘काय खासदार..’ अशी जी हाक मारली तो क्षण आनंदाचा होता. त्यांची ती हाक माझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी होती..हा क्षणच माझ्यासाठी अद्भुत आणि अविस्मरणीय होता.

आज दिल्लीतील पहिला दिवस…दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये देशातील सर्व मंडळी आली होती. एनडीएचे नेते म्हणून आज मा. नरेंद्र मोदी साहेबांना यांना नेमण्यात आले. मा. नरेंद्र मोदी साहेब, मा. अमितजी शहा साहेबांना यांना आज अगदी जवळून पाहता आले. देशातील जनतेसाठी धोरणात्मक निर्णय घेताना ही दिग्गज माणसे अग्रेसर असतात, आज याच दिग्गजांबरोबर एकत्र बसण्याचा योग आला. या दिग्गजांसोबतच आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब (Chief Minister Eknath Shinde)यांचे सभागृहात झालेले भाषण ऐकता आले, त्यांनी केलेले मार्गदर्शन हे निश्चितच मला प्रेरणादायी आणि बळ देणारे होते. आज या सेंट्रल हॉलमध्ये मला जे पाहता आले, अनुभवता आले हे केवळ खासदार म्हणून मला ज्यांनी योग्य समजले व ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे हे श्रेय आहे.

वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe)साहेब यांचे आशीर्वाद, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन, आई-वडील यांचे प्रेम आणि माझ्या तमाम ठाणेकर जनतेने दिलेल्या विश्वासाने एक शिवसैनिक कार्यकर्ता संसदेत जातो हा माझ्यासाठी आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. खासदार म्हणून निश्चितच जबाबदारी वाढली असून या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरण्याची शक्ती मला मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.