

केजरीवालांच्या पीएला ‘एनसीडब्ल्यू’चे समन्स
नवी दिल्ली (New Dellhi), 16 मे : खासदार स्वाती मालीवाल (MP Swati Maliwal) गैरवर्तन प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि स्वीय सहायक बिभव कुमार यांना समन्स बजावले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना उद्या, शुक्रवारी 17 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बिभव कुमार यांच्यावर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद सिंह कुशवाह आणि उत्तर जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी नवी दिल्लीतील राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्या घरी गेले होते.
मालीवाल यांच्याकडून घटनेच्या वेळी दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मदतीसाठी दोन वेळा फोन गेले होते. परंतु, यासंदर्भात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेत कारवाई केलीय.