पुणे -प्रसिद्ध लेखक उपराकार लक्ष्मण माने यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा स्वतःच्या बोकांडी मारून घेण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया माने यांनी व्यक्त केली आहे. ते छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे व अन्य सरदारांच्या घराण्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार का? असा सवालही माने यांनी उपस्थित केलाय.
प्रसार माध्यमांशी बोलताना माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कुणबी समाजाला पूर्वी सवलती मिळत असताना आम्ही ९६ कुळी असल्याचे सांगत मराठा समाज बाजूला राहिला. मराठा समाज कुणबी म्हणून समोर आला असता तर आता ओबीसींना जे २७ टक्के आरक्षण मिळते, त्यापेक्षा जास्त आरक्षण मिळाले असते. आत्ता आहेत त्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा पाडून घेणे आहे, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे जरांगे हे मनुवादी वृत्तीचे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ते देण्याच्या मागणीला विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मागासवर्गीय जातींवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, असेही माने यांनी सांगितले. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे वर्चस्व आहे. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. सर्वाधिक आमदार, खासदार मराठा समाजाचे आहे. सहकारी संस्था त्यांच्या हातामध्ये असून, सर्वच क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांना आरक्षणाची गरज का पडत आहे, याचा विचार मराठा समाजाने करावा, असेही ते म्हणाले.
















