

मुंबई (Mumbai) , 5 फेब्रुवारी भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचा सराव करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या वनडे मालिकेत भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा सराव करणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यातील काय योजना असणार आहेत, याबाबत माहिती देण्यास सांगितलं आहे. असा दावा एका वृत्तातून करण्यात आला आहे. बीसीसीआय किंवा रोहित शर्माने यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
बीसीसीआयने २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापासून संघ बांधणीसंदर्भातील विचार सुरु केला आहे. वनडे शिवाय कसोटी संघातही बदलाचे प्रयोग करण्याचा बीसीसीयचा प्रयत्न दिसतोय. या प्रयोगासाठी बीसीसीआय नियमित कॅप्टन्सीचा पर्याय शोधत आहे. याचा अर्थ रोहित शर्माच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे. वृत्तानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधार रोहित शर्माला भविष्यातील योजनासंदर्भातील माहिती बीसीसीआयला कळवावी लागणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा रोहित शर्मासाठी अधिक महत्त्वपूर्ण झाली आहे. त्याच्या भविष्याचा फैसला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होऊ शकतो. याचा अर्थ तो या स्पर्धेनंतर निवृत्ती घेईल, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माला आपल्या फलंदाजीतील जादू दाखवता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली कसोटीत टीम इंडियावर नामुष्की ओढावलीये. भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ आली. यामुळे रोहित आता रडारवर आहे. पण जर भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आणि रोहितनं या स्पर्धेत आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली तर त्याच्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी अन् करियअर आणखी काही वर्ष लांबवण्यासाठी आपली बाजू भक्कम मांडण्याची संधीही निर्माण होईल. पण या उलट घडलं तर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा खऱ्या ठरू शकतात.