Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा, ‘या’ भागात पोलीस अलर्ट मोडवर

0

लोकसभेत आज वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. मुस्लिमबहुल भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा, मुस्लिमबहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर
लोकसभेत आज वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. मुस्लिमबहुल भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

वक्फसंदर्भात जे बिल आज लोकसभेत मांडलं जाणार आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी आत्तापासूनच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. या बिलाला विरोधकांचा विरोध असला तरी बहुमत हे सरकारच्या बाजून आहे. त्यामुळे हे बिल मंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळेच मुस्लिमबहुल भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठीच महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व यंत्रणा या अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जे मुस्लिमबहुल भाग आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळी युनिट्स ही बंदोबस्तासाठी वाढवण्यात आलेली आहेत. शिवाय त्याचसंदर्भातील अलर्टही महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आला आहे. दुपारपर्यंत वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक आंदोलन होण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.

अनेक मुस्लिमबहुल भागांमध्ये काल रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आज दिवसभरदेखील ही खबरदारी घेण्यात येणार आहे , तशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या राज्यांतही अलर्ट

वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार मध्येही अलर्ट आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. तसेच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू मांडणार वक्फ सुधारणा विधेयक

दरम्यान केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे आज वक्फ सुधारणा विधेयक मांडणार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून जगदंबिका पाल, रवी शंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे, सुधांशु त्रिवेदी, मेधा कुलकर्णी, भागवत कराड विधेयकावर बोलणार आहेत.

मित्रपक्षांना फक्त 40 मिनिटं

वक्फ विधेयकावर बोलण्यासाठी भाजपच्या मित्रपक्षांना फक्त 40 मिनिटं देण्यात येणार आहेत. एनडीएमधील पक्षांना लोकसभेत बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ असेल, त्यापैकी 4 तास भाजपाचेच खासदार बोलणार आहेत. तर मित्रपक्षांना फक्त 40 मिनिटांत विधेयकावर बाजू मांडता येईल.