

नागपूर (Nagpur) – वक्ता दशसहतस्रेषु प्राचार्य राम शेवाळकर (Speaker Dashsahatsreshu Principal Ram Shewalkar) यांच्या सहधर्मचारिणी व आशुतोष शेवाळकर यांची आई श्रीमती विजयाताई यांचे आज गुरूवारी २ मे रोजी सकाळी नागपूर येथील डॉ माहूरकर यांच्या रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षाचे होते. १३ मे ला त्या 87 व्या वर्षात पदार्पण करणार होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आशुतोष, स्नुषा सौ. मनीषा यांच्यासह अपाला, अभिराम व बिल्वा ही नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
नुकतेच त्यांच्या मुलाखतीचे” सहवासाच्या चांदण्यात” हे रेखा चवरे यांनी लिहिलेले पुस्तक सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. विजयाताईंचा आप्तपरिवार फार मोठा होता. अनेकांना त्यांनी आईचा आधार दिला होता. त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते परंतु त्यांनी आपले जीवन राम शेवाळकरांच्या जीवनाला समर्पित केलं होतं. त्यामुळेच राम शेवाळकर म्हणत की मी जे काही आयुष्यात करू शकलो ते तुझ्या मुळेच.
सुरुवातीच्या काळात “ध्रुव “हे बालक मंदिर त्यांनी काढले होते. काही वर्षे ते उत्तम रीतीने चालविलेही. परंतु राम शेवाळकरांच्या कार्याचा व्याप वाढल्यानंतर त्यांनी ते बंद करून आपला पूर्णवेळ त्यांना दिला. विशेष म्हणजे उद्या दि 3 मे रोजी राम शेवाळकर यांचे पुण्यस्मरण असते. नेमक्या त्याच्या एक दिवसापूर्वी विजयाताईंनी अखेरचा निरोप घेतला.
त्यांच्या निधनाने राम शेवाळकर यांच्या विशाल परिवारातील अनेकांना आपला मातृवत आधार गेल्याचे दुःख झाले आहे.