विदर्भाचा ब्रॅण्ड ‘तर्री’

0

विदर्भाचा ब्रॅण्ड ‘तर्री’

विदर्भातील व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला चमचाभर तर्रीचा वास दिला तरी तो तात्काळ शुध्दीवर येतो अशी आख्यायिका आहे. तर्रीचा कर्ता, करविता आणि चाहता व्हायचं असेल तर जन्म विदर्भातच व्हायला हवा. वैदर्भिय माणसाचे रक्त लाल असण्यामागे केवळ हिमोग्लोबिन नसून लाल आणि तिखट तर्रीही तितकीच जबाबदार आहे. कानातून घाम निघणे हेच तर्री पावल्याचे जीवंत लक्षण आहे. तर्री हा तरल स्थितीतील पदार्थ असुन याचा रंग लालच असतो. एक लालसर रंगाचा चमकणारा आणि खव्वैय्याला खुणावणारा पातळसा तैलीय पदार्थ हाच तर्रीचा आत्मा आहे. तर्रीचा जन्म जरी पोह्याचा स्वाद वाढवण्याकरता झाला असला तरी कोणत्याही तीखट पदार्थाबरोबर जुळवुन घेण्याची नवरदेवी कला याला अवगत असते. पोह्यावर तर्री पडताच, आपसूक पोह्यात विलीन होते,मग उगाच तर्रीतील दोन चार हरभरे, ‘आपण नाही बुवा त्यातले’ सांगुन पोह्यावर उभे राहुन आपलं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात.

तर्री हा पदार्थ कालच खाल्ला याची आठवण ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी तर्री स्वत:, तर्री खाल्लयाची आठवण करून देते, आणि आठवण करून न दिल्यास हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तर्री खाण्यास मोकळा.

व्यवस्थित तर्री बनवणं हे काही खायचं काम नाही, जरी बनवलेली तर्री हे खायचं काम असेल तरी. ज्याप्रमाणे कुशल गाडीवानच गाडी उत्तम रितीने चालवु शकतो त्याचप्रमाणे तर्री छान बनवायला कुशल तर्रीवानच हवा. एकदा का यांच्या तर्रीने अंघोळ करून पदार्थ शुचिर्भूत झाला की कोणीही पदार्थाची मूळ चव काय? हा प्रश्न उपस्थित करत नाही. अगदी गंगास्नान झाल्यावर जसा माणूस पापमुक्त होतो त्याचप्रमाणे तर्रीस्नान झाल्यावर मूळ पदार्थ हा चवमुक्त होतो आणि मग चर्चा उरते ती केवळ तर्रीची. तर्रीबाज पदार्थ खाणारा तर्रीबाज नव्हे तर “थोडी तर्री और डालो” म्हणणाराच पट्टीचा तर्रीबाज.

एखाद्या तर्रीबाजाने आठ पंधरा दिवस तर्री न खाता काढलेच तर त्या तर्रीपरायण व्यक्तीच्या मेंदुला तर्रीचे दर्शन व पुरवठा न झाल्याने तरतरी कमी होऊ शकते.

तर्री कशाची आहे (मटर की हरभरा) हे महत्त्वाचे नाही. तर्री हे स्वत:च एक परिपूर्ण पॅकेज आहे. वांग्याच्या भाजीवर असलेल्या तेलाच्या तवंगाला तर्री म्हणून, तर्रीचा अपमान करू नये. अस्सल तर्रीबाज हे फुलपाखराप्रमाणे तर्रीच्या सुगंधाकडे ओढले जातात. केवडा, मोगरा गुलाब या सारख्या सुगंधी अत्तराच्या बाटल्या आल्यात पण अजून तरी कोणीही हा तर्रीगंध बाटलीबंद स्वरूपात आणला नाही. आणल्यास, साध्या पाण्यात मिसळून परदेशस्थ भाऊबंदांना तर्रीचा आनंद मिळु शकतो. काही लोक, तर्रीला तेलाचा तवंग एवढंच समजतात, अशा लोकांना तर्री खाल्ल्यावर विशेष त्रास होण्याची शक्यता असते.

कोकणातील माणसाने तर्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यात चिंच, गुळ, ओले खोबरे घातल्याने, तसेच दक्षिण महाराष्ट्रीय माणसाने शेंगदाणे घातल्याने, तर्रीची धार बोथट होते. त्यामुळे उगीच काहीतरी, तर्री म्हणून खाण्याऐवजी अस्सल ठसकेबाज तर्री खाण्यातच धन्यता बाळगावी. इतरांना पाण्यात पाहण्याऐवजी, तर्रीत पहायचा प्रयत्न केला तरी माणसाचे जीवन सुसह्य होईल यात शंका नाही.

सर्व तर्रीखाॅऺं साहेबांना हा तर्रीतराणा समर्पित.

 

@ चंद्रशेखर दातार