विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार फसव्या नागपूर कराराची होळी

0
अँड. वामनराव चटप
अँड. वामनराव चटप

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समिती २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करणार आहे, ज्याचा उद्देश विदर्भावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे आहे. गेल्या १२ वर्षांपासून समिती नागपूर कराराच्या विरोधात आंदोलन करत आहे. समितीचा आरोप आहे की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विदर्भावर नागपूर कराराच्या माध्यमातून अन्याय झाला आहे, जो राज्यकर्त्यांनी कधीच पूर्ण केला नाही.

विदर्भात बारमाही नद्या, विपुल खनिज संपत्ती, वनसंपदा असूनही, या प्रदेशाचा विकास खुंटलेला आहे. नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनही विदर्भातील जनता सिंचनाचा अनुशेष, बेरोजगारी आणि अत्यल्प वीजपुरवठ्यासारख्या समस्यांना सामोरे जात आहे. सिंचन प्रकल्पही अपूर्ण राहिल्यामुळे १४ लाख हेक्टर जमीन अजूनही सिंचनाखाली येऊ शकलेली नाही.

अँड. मधुकरराव किंमतकर यांच्या संशोधनानुसार, विदर्भातील सिंचन अनुशेष ६० हजार कोटींवर पोहोचला आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी आणि आदिवासी विकासासारख्या क्षेत्रातही अनुशेष १५ हजार कोटींवर गेला आहे. या समस्यांमुळे वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि औद्योगिक विकासाच्या अभावामुळे तरुण वर्ग दिशाहीन झाला आहे.

विदर्भात कोळसा-आधारित वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, परंतु यातील ८७ टक्के वीज इतर भागांत वापरली जाते, ज्यामुळे विदर्भ अंधारात आहे. औष्णिक वीजनिर्मितीमुळे प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे, ज्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी सांगितले की, ६४ वर्षे उलटूनही नागपूर कराराच्या अंमलबजावणीसाठी कोणतेच ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. समितीच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी केली जाणार आहे.

यावेळी डॉ.श्रीनिवास खांदेवाले-जेष्ठ कोअर कमिटी सदस्य, रंजनाताई मामर्डे- अध्यक्षा, महिला आघाडी, अरुणभाऊ केदार अध्यक्ष, पूर्व विदर्भ, मुकेश मासुरकर- अध्यक्ष, युवा आघाडी, प्रा. डॉ.पी.आर. राजपूत -कोअर कमिटी सदस्य, नरेश निमजे शहराध्यक्ष, नागपूर शहर, प्रशांत नखाते-जिल्हाध्यक्ष, नागपूर, अशोक धापोडकर -कोअर कमिटी सदस्य, गुलाबराव धांडे-जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर, गंगाधर मुंडकर उपस्थित होते.