

* नव्या स्वरूपातील महाराष्ट्र ग्रामीण बँकचे १ मे पासून कार्यान्वयन
* नागपुरातील मुख्यालयाचे संभाजीनगरात स्थानांतरण
नागपूर (NAGPUR) : महाराष्ट्रातील बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून नियंत्रित व संचालित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोंकण ग्रामीण बँक यांचे येत्या १ मे पासून एकत्रीकरण केले जाणार असून, यापुढे ही बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक या नावाने ओळखली जाणार आहे. केंद्र सरकार, नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट, महाराष्ट्र सरकार आणि ज्या बँकांच्या माध्यमातून या ग्रामीण बँकांचे संचालन आजवर होत आले, या सर्वांनी घेतलेल्या एकत्रित निर्णयाच्या परिणामस्वरूप आता या बँकेचे नागपुरातील मुख्यालयदेखील येत्या महाराष्ट्रदिनापासून संभाजीनगर येथे हलविले जाणार आहे.
संयुक्त सचिव पंकज शर्मा यांच्या स्वाक्षरीने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका आदेशान्वये ही अधिसूचना घोषित करण्यात आली आहे. एकत्रीकरणानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवीन बँकेकडे आजवरच्या व्यवस्थेतील कार्यपद्धती, अधिकार, प्राधिकार, बँकेची चल-अचल संपत्ती, निधी आदी सर्व बाबींचे हस्तांतरण दरम्यानच्या कालावधीत केले जाणार आहे. इतकेच नव्हेतर आजवर कार्यरत महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या नावे असलेले सुमारे २ हजार कोटी रुपयांचे भागभांडवल सुद्धा एकत्रीकरणानंतरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे.
स्वाभाविकच, बँकेच्या व्यवहाराशी निगडीत सर्वच कामे यापुढे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून होणार आहे. आजवरच्या खातेधारकांची, ठेवीदारांची, कर्जदारांची जबाबदारीही नवीन बँकेला सुपूर्द होणार आहे. बँकेचे कर्मचारीदेखील सध्याचे वेतन, पद, जबाबदारी, अटी व शर्तींवर नवीन बँकेत कार्यान्वित होतील, मात्र सध्या नागपुरात कार्यरत असलेले कुठल्याही बँकेचे एकमेव मुख्यालयदेखील यानंतर नागपुरातून हलविले जाणार आहे.