संघटित समाजामुळेच दुर्जनशक्तीवर विजय : प्रशांत पोळ

0

तीनदिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेला प्रारंभ

नागपूर (nagpur), 14 एप्रिल
समाज जेव्हा संघटित होऊन दुर्जन शक्तीचा नाश करेल, तेव्हाच सज्जनशक्ती निर्माण होईल आणि देवत्व येईल. रामाने सर्वांना संघटित करून रावणावर विजय मिळविला, असे दिशा कन्सल्टंटचे संचालक प्रशांत पोळ यांनी सांगितले. ते रामस्मरण व्याख्यानमालेत बोलत होते.

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक परिसरातील महर्षी व्यास सभागृहात केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 14 ते 16 एप्रिल रामस्मरण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘मंदिर निर्माण ते राष्ट्रनिर्माण’ या विषयावर प्रशांत पोळ यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष सुनील काशीकर होते.

प्रशांत पोळ पुढे म्हणाले, व्याख्यानमाला ही समाजप्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. आपल्या देशाच्या इतिहासात आजतागायत जे घडलं नाही ते 22 जानेवारीला घडलं. जगात जिथे जिथे हिंदू राहतात, त्यांनी त्या दिवशी एकत्र येऊन जयघोष केला. सीतेचे हरण झाल्याचे कळल्यावर रामाने चतुरंग सेना का बोलावली नाही, शूर्पनखेचे नाक कापण्याचा आदेश लक्ष्मणला देतात, बालीचा वध करतात असे प्रश्न पडतात. विश्वामित्रांसोबत जाताना ते रामाला म्हणतात, या देशात एकही राक्षसी मनोवृत्ती राहणार नाही, असे कार्य कर. वाल्मिकी रामायणात श्रीरामांचा प्रवास जो आहे त्यात सर्व तपस्विंनी त्यांना आसुरी शक्तींपासून वाचविण्याची विनंती केली आणि रामाने ते कार्य केले.

अध्यक्षीय मनोगतात सुनील काशीकर म्हणाले, मंदिर निर्माण ते राष्ट्रनिर्माण. रामाचे चरित्रच असे आहे की त्याचे अवलोकन सामान्य करतील तर आपोआप राष्ट्र निर्माण होते. या मंदिरातून ती प्रेरणा सतत पाझरावी, यासाठी मंदिर निर्माण झाले. समाजजीवन घडण्यासाठी हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हाच व्याख्यानमालेचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
व्यासपीठावर कलासंगमचे अविनाश वासे, अमर आकरे, केशवनगर सांस्कृतिक सभेचे सतीश खोत, प्रभाकर बढे यांची देखील उपस्थिती होती. यानंतर केशवनगर शिशूमंदिरच्या विद्यार्थ्यांनी ‘राम राम तारकम्’ हे रामगीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

……
व्याख्यानमालेत आज
सोमवार, 15 रोजी ‘कुटुंबवत्सल राम’ या विषयावर विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली जोशी यांचे व्याख्यान.