


खासदार स्वात मालीवाल मारहाण प्रकरण
नवी दिल्ली(New Delhi), 18 मे स्वाती मालीवाल(Swati Maliwal) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी विभव कुमार याला आज, शनिवारी अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. विभवला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस त्याच्या लोकेशनचा सतत तपास करत होते.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण झाली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी विभव कुमारला अटक केली आहे. विभवला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेण्यात आले. तेथून पोलिसांनी त्याला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात नेले. दिल्ली पोलिसांना विभव दिल्लीबाहेर नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस विभवला घेऊन सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये पोहोचताच ‘आप’च्या लीगल सेलचे प्रमुख संजीव नसियार यांनी जबरदस्तीने तेथे घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला बाजूला केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभव कुमारने दिल्ली पोलिसांना त्याच्या तक्रारीसंदर्भात पाठवलेल्या मेलचा आयपी ॲड्रेसही पोलिसांनी ट्रॅक केला होता. अनेक टीम सतत विभवचा शोध घेत होती आणि अखेर विभवला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले.
वास्तविक, 13 मे 2024 रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती आणि तिने अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय विभव कुमारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करून शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आपले बयाण नोंदवले ज्यामध्ये विभववर गंभीर आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलीस विभवला अटक करण्यासाठी त्याच्या ठिकाणाचा सतत तपास करत होते.विभव पंजाबला पळाल्याची चर्चा होती. यादरम्यान तो मुख्यमंत्र्यांच्या घरात दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि आज, शनिवारी विभव मुख्यमंत्री निवासाच्या मागच्या दाराने जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.