

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
पुणे(Pune)
संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसेदेखील परत केले आहेत. पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.
दरम्यान, आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय येत्या काही दिवसांत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार असून लवकरच पुढील हप्ताही देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीपर्यंत राज्यात २ कोटी ५२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. तर पुणे जिल्ह्यात २० लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते. योजनेला १५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. तर १६ ऑक्टोबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जांची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाखांहून अधिक अर्ज आचारसंहितेत अडकले होते.