

नवी दिल्ली येथे उदयोग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सत्कार
नागपूर (NAGPUR), 7 एप्रिल
स्थानिक उदयोन्मुख आयुर्वेदिक वेलनेस स्टार्टअप वेद संजीवनी ने दिल्ली येथे झालेल्या ‘स्टार्टअप महाकुंभ 2025’ मध्ये आपली विशिष्ट छाप सोडत ‘डी2सी’ गटात विजेतेपद पटकावले. उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ‘वेद संजीवनी’ला ५ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी शार्क टँक फेम बोटचे संस्थापक अमन गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती.
भारत मंडपम, नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठे स्टार्टअप संमेलन ‘स्टार्टअप महाकुंभ 2025’ चे ३ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातून सुमारे ३,००० स्टार्टअप्स आणि २.३ लाख जागतिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
रेखा दोशी, दीपक दोशी, चिराग दोशी, सिद्धांत दोशी, गुंजन दोशी आणि चिराग वार्टी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या वेद संजीवनी या स्टार्टअपने प्राचीन आयुर्वेद शास्त्रावर आधारित नाभी विज्ञानाचा पुनरुज्जीवन केले आहे. त्यांनी तयार केलेले नाभी ऑइल्स आणि आयुर्वेदिक थेरपी शरीराचे मूलभूत कार्य संतुलित करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
वेद संजीवनीचे हे यश त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांचे फळ असून भारतीय आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.