VBAचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची जातीय राजकारणावर टीका

0

नागपूर, ९ नोव्हेंबर २०२४: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतील रामबाग येथे आयोजित प्रचार सभेत घराणेशाही आणि जातीय राजकारणावर तीव्र टीका केली. “गेल्या ७५ वर्षांपासून देशात घराणेशाहीचे साम्राज्य बळावत आहे. 

सर्व राजकीय पक्षांनी हीच परंपरा चालू ठेवली आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव अपवाद आहे ज्याने नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे. माननीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी देऊन वंचित बहुजन समाजाला पुढे नेण्याचे कार्य सुरू ठेवले आहे,” असे भांगे यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले. 

त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवित म्हटले की, “राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संविधान बचाव असा नारा दिला. सगळीकडे संविधानाची लाल प्रत घेऊन ते फिरतात, परंतु परदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करतात. त्यांचा हा खरा चेहरा आहे. ते केवळ वंचित बहुजन समाजाला मतासाठी वापरतात. काँग्रेसचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी ‘आंबेडकर या नावाची काँग्रेसला गरज नाही’ असे विधान करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला आहे.” सभेला मंचावर वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणीतील प्रमुख नेते राजूभाऊ लोखंडे, रविभाऊ शेंडे, सौ. संगीताताई गोधनकर, प्रसन्नाकुमार दुरूगकर आणि संजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.