Vatpurnima : वटपौर्णिमेनिमित्त शिवनगरात “कोण बनेल शिवनगरची वटसावित्री क्वीन?”

0

नागपूर(Nagpur)२१ जून :- वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे. या सणाच्या निमित्ताने महिला एकत्र येऊन आनंद साजरा करतात. याच वटपौर्णिमेचं औचित्य साधून, हुमनीटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजा ताई मानमोडे यांच्या पुढाकाराने हनुमान वडमंदिर शिवनगर येथे वटपौर्णिमेच्या निमित्ताने “कोण बनेल शिवनगरची वटसावित्री क्वीन?” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सपना भाकरे यांनी विजेतेपद मिळवून “शिवनगरची वटसावित्री क्वीन”चा मान मिळवला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सोशल फाउंडेशनच्या वतीने पैठणी देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वृंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. या मुख्य स्पर्धेसोबतच उखाणे क्वीन, नववारी वेशभूषा, पूजेची थाळी सजावट, फ्री मध्ये फोटोशूट,जोडी तुझी नी माझी अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली तर स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व सहभागी महिलांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली. वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि महिलांमधील प्रतिभा आणि कौशल्ये उजळून आणण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम निश्चितच उत्सवपूर्ण आणि प्रेरणादायी होता. “कोण बनेल शिवनगरची वटसावित्री क्वीन” या स्पर्धेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण आणि सामाजिक बंधुता यांचा संदेश देण्याचा उद्देश होता. या स्पर्धेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आणि त्यांना एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.