

नागपूर NAGPUR Maharashtra Assembly -विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसानंतर आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी शेतकऱ्यांवरील संकटाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहाचे सर्व कामकाज बाजुला करून या मुद्यावर चर्चा सुरु करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते Vijay Vadettiwar विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रश्नावर चर्चा घेण्याची आपली तयारी असून आजच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सागून विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला.
तत्पूर्वी हा मुद्दा उपस्थित करुन वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यांत नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात अवकाळीने पीक गमावले.आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरी देखील चर्चा करू, असे सरकार मोघम उत्तर देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अशी टिका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. पिक विम्याचा हप्ता म्हणून सरकारने कोट्यवधी रुपये कंपन्यांकडे जमा केले. मात्र, पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरु आहे. सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यासाठी सभागृहात तातडीने चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चेबाबत आजच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.