

अप्पर वर्धा धरणानी वाजविली धोक्याची घंटा
अप्पर वर्धा धरणाला 30 वर्षे पूर्ण; सुरक्षेची चिंता वाढली
जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांच्या पत्राची दखल
जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, धरण सुरक्षा, स्थापत्य मुख्य अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांची धरण स्थळाला भेट दिली.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा मोठा प्रकल्प 1978 साली सुरू झाला होता आणि त्याचे धरण 1993 साली पूर्ण झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी या धरणाच्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारला याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता त्रयी आणि इतर अधिकारी धरण स्थळाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी धरणावर 12×15 गेट व त्यांचे कार्य व तपासणी केली.
जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी या धरणाच्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत सरकारला पत्र दिले. त्यांच्या मते, जर वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर धरण फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. धरणाच्या वक्रद्वारांवर निर्माण झालेला दाब आणि गंज ही एक प्रमुख चिंता आहे. यामुळे स्टीफनर प्लेट्सवर दाब वाढला आहे आणि टीजी बॉक्सची क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धरणाला महापूर आला तर या स्थितीत धरणाला मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या गंभीर मुद्द्याकडे प्रशासनाने गांभीर्य दाखवलेले नव्हते. याबाबतची माहिती एक वर्षापूर्वीच सरकार व प्रशासनाला देण्यात आली होती, परंतु त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे डॉ. महाजन यांनी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना पत्र पाठविले. त्यावर अधीक्षक अभियंता तथा उपसचिव न. गौ. बसेर यांनी नागपूर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन उचित कारवाई करण्याची सूचना दिली आहे. काल दुपारच्या सुमारास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता त्रयी आणि इतर अधिकारी धरण स्थळाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी गेले. त्यांनी धरणावर 12×15 ची तपासणी केली. या गेटचे डिझाईन सीडीओच्या माध्यमातून 1986 ला करण्यात आले होते. यानंतर या डिझाईनचा वापर बावनथडी प्रकल्पावर करण्यात आला. मुंबईच्या मध्य वैतरणा धरणात सुद्धा या गेटचा वापर करण्यात आला होता. जिगांव प्रकल्पावर याच डिझाईनचे गेट उभारणीचे काम चालू आहे. या पाहणी दौऱ्यानंतर अभियंते आपापल्या कार्यालयात गेल्यावर यावर काय निर्णय घेतात, याकडे अप्पर वर्धा धरण परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. अप्पर वर्धा धरण परिसरातील लोक या धरणाच्या सुरक्षेबद्दल खूप चिंतित आहेत. त्यांना भीती वाटते की, जर धरण फुटले तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. या धरणाच्या सुरक्षेसाठी नुसताच सविस्तर अभ्यास करण्याची आवश्यकता तर आहेच पण त्यांची तातडीने दुरुस्ती या नविन उभारणी करणे जनतेच्या जीवासाठी महत्वाचे आहे . सरकारने त्वरित निर्णय घेत या धरणाचे जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घ्यावे. अन्यथा, या धरणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.