

मुंबई (Mumbai), ३ नोव्हेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाला उल्हासनगरमधून (जि. ठाणे) अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲपवर एक संदेश पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये लिहिले होते की, “जर मुख्यमंत्री योगी यांनी १० दिवसांत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही, तर बाबा सिद्दीकींप्रमाणे त्यांचीही हत्या केली जाईल.” त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान फातिमाच्या मोबाईलवरून योगी आदित्यनाथ यांच्या नावाने धमकीचा मेसेज पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपासाअंती मुंबई पोलिसांनी फातिमा खानला अटक केली.
पोलीसांनी सांगितले की, फतिमा खानने उच्च शिक्षण घेतले आहे, मात्र ती सध्या मानसिक आजाराने त्रस्त आहे. आरोपी महिलेने आयटीमध्ये बी.एस्सी पदवी मिळवली असून ती मुंबईजवळ ठाण्यात कुटुंबासह राहते.