“शिंदे असेपर्यंत मी कुठेही जाणार नाही”-बच्चू कडू

0

(Amravti)अमरावती : मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोवर मी कोठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केली. गुरुवारी शरद पवार आणि आमदार कडू यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर बोलताना आमदार कडू यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (Sharad Pawar visit Bachchu Kadu House)

शरद पवार हे सध्या अमरावतीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावर आज गुरुवारी शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडूच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीत थोडी सामाजिक व थोडी राजकीय चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे ही रोजगार हमी योजनेत व्हायला हवेत. ही बाब तुमच्या अजेंड्यामध्ये असायला हवी, असे मी त्यांना सुचवले, असल्याचे कडू म्हणाले. कडू म्हणाले की, आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, समजा जर ती झाली असेल तरी तुम्हाला सांगायचे काही कारण नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अजून आकाशात ढगच आले नाही, ढग आल्यावर बघू, असेही ते म्हणाले.