

हवामान विभागानं वर्तवला अंदाज
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, अशातच हवामान विभागानं पुढील 3 दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्याच्या विविध भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ भागात पाऊस पडणार
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे.
शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहे. सध्या नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, उन्हाचा तडाखा वाढला होता. अशातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुलं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मगं झाल्याचे दिसून येत आहेत.
वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम
वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम झाला आहे. आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये पत्रा अडकल्याची घटना घडली आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं बाहेरुन पत्रा उडून ओव्हर हेड वायरवर येऊन पडला आहे. यामुळं कसऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एक लोकल 15 मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेस 8 मिनिटे थांबली होती. पंधरा ते वीस मिनिटे वाहतूक सुरळीत होण्यास लागली.
भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात
भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली आहे. सकाळपासूनच उकाडा होत असल्याने अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. वादळी वारा व पावसामुळं काही ठिकाणी पत्रे कोसळली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्याही पडल्या आहेत. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.