अमरावतीमधील हत्याकांडाचा उलगडा

0

वेगळेच कारण आले पुढे : अनेक बाबी अद्याप अस्पष्ट

अमरावती. नांदगावपेठेत (Nandgaonpeth) एकाची गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आली होती. मृत आणि मारेकरी अज्ञात असल्याने प्रकरणाचा तपास आव्हानात्मक ठरला होता. सोशल मीडियामुळे (social media) मृताची ओळख पटली. तो कॅबचालक असून नागपूरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तपासाला गती मिळाली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करीत पोलिसांनी आरोपीचा सुगावा लावला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून या घटनेतील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. घटनेच्या ५ दिवसांनंतर घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला शनिवारी अमरावतीत परत आणण्यात आले. लुटीच्या उद्देशाने गळा चिरून त्याची हत्या करण्यात आल्याचे पुढे येत आहेत. पण, अनेक बाबी अजूनही अस्पष्ट आहेत. यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
सिध्देश्वर चव्हान (२६) रा. खलवे, पोस्ट बोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर असे अटक आरोपीचे नाव आहे. तोच या घटनेचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत त्याच्या अन्य एका साथीदाराचाही सहभाग होता. त्याचाही कसोशीने शोध घेण्यात येत आहे. २६ मार्चच्या मध्यरातारीनंतर ३.४५ वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडले होते. नांदगावपेठ भागातील रहिवासी लक्ष्मण शिंगणजुडे यांच्या घराच्या पोर्चमध्ये दोघांनी हा खून केला होता. त्यावेळी मृतक भय्या बचाव असे ओरडल्याने, शिंगणजुडे यांना जाग आली. त्यानी घरातूनच हे दृष्य बघितले. त्यांच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मृताचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मृतक अजीमखान खालिदखान (२७) रा. नागपूर असल्याची ओळख पटली. तो कॅबचालक होता. पुढे त्याचे वाहन रहाटगावनजिक अपघातग्रस्त स्थितीत आढळून आले होते. त्यामुळे अजीमखानची हत्या करून आरोपी मृताची कार घेऊन पळाल्याचे व तिला पुढे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाशी संबंधित असणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यात आरोपी स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे तपासाची दिशाही निश्चित झाली. एक एक धागा जोडत पोलिसांनी मुख्य आरोपीला हुडकून काढत त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध इंदापूर ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा साथीदार माळशिरस तालुक्यातील आहे. टॅक्सीचालकांना मारहाण करून त्यांना लुटायचे, हा आरोपींचा समावेश असलेल्या टोळीची गुन्ह्याची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपुरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

दोन्ही आरोपी नागपूरच्या बर्डी येथून अजीमखानच्या कारमध्ये बसले होते. ते तेथील सीसीटीव्हीत कैद झाले होते. याशिवाय ज्या ऑटोचालकाने आरोपींना अजीमखानच्या कारमध्ये बसविले होते, त्याच्या सांगण्यावरून नागपूरच्या एअरपोर्टसह तेथील रेल्वेस्टेशन व अमरावतीचे असे एकुण ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.