केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित

0

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी श्री गडकरीजी यांनी या पुरस्कारासाठी शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

“हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या नावात खूप मोठी शक्ती आहे. भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित केले. देशाचे पहिले कृषीमंत्री म्हणून ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांसाठीची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला.

कृषी क्षेत्राबरोबरच शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे, यादृष्टीनेही ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. विदर्भात शैक्षणिक क्रांती घडवण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.

पंजाबराव देशमुख यांचे नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व आणि त्यांनी दिलेले विचार, दृष्टी आज वर्तमानकाळातही अतिशय महत्त्वाची आहे.” असे विचार श्री गडकरीजी यांनी या वेळी व्यक्त केले.