

सोलापूर (Solapur), 24 नोव्हेंबर
काका महेश कोठे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे देवेंद्र कोठे हे वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदा २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये महेश कोठेंसोबत शिवसेनेत गेलेले देवेंद्र कोठे दुसऱ्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले. पण, २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने महेश कोठेंनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. पण, देवेंद्र कोठेंनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना विधानसभेची संधी दिली.
पदवीप्राप्त देवेंद्र कोठे हे शांत स्वभावाचे व त्यांच्या प्रभागात नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वडील स्व. राजेश कोठे यांच्या व आजोबा विष्णूपंत कोठे यांच्या स्मरणार्थ निराधारांना अन्नदानाचे कार्य हाती घेतले. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. नगरसेवक म्हणूनही त्यांनी दहा वर्षात नावलौकीक मिळविला होता.
मागील अडीच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज असल्याने त्यांनी जनतेत राहणे पसंत केले होते. कोठे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मी तुझ्यासोबत राहीन, तु तयारी कर, काम कर म्हणून सल्ला दिला होता. तो सल्ला मानून कोठेंनी शहर मध्य मतदारसंघात महिला, श्रमिक वर्गांसाठी विविध मोहिमा राबविल्या. आरोग्य शिबिरे घेतले, लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कॅम्प घेतले. लोक ते विसरले नाहीत. त्यांनी मतदानाच्या रुपाने कोठेंना साथ दिली.