

उथळपेठ, डोंगराळ परिसरात वसलेलं एक गाव (Uthal Peth Village in Mul (Chandrapur) Maharashtra). गावाशेजारी गायमुख हे प्रसिद्ध व ऐतिहासिक स्थळ आहे. गायमुख परिसरात पुरातन मंदिरे, पाण्याचे कुंड आणि विपूल वनराई आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी अत्यंत पोषक असे वातावरण येथे आहे. वन, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उथळपेठ या गावाला दत्तक घेतले आणि गावाच्या विकासासह निसर्ग पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात आला. उथळपेठ हे दत्तक गाव एक नवे देखणे रूप घेवून नागरिकांच्या व पर्यटकांच्या सेवेत रूजु होत आहे. इतकेच नव्हे तर गावातील वाचनालयाची इमारत भव्यदिव्य अशीच आहे.
————
उथळपेठ हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असल्येल्या येत. या गावात ८५३ लोकसंख्या आहे. यातील 653 मतदार आहेत. गावातील ५०५ व्यक्ती साक्षर आहेत. उथळपेठ गावात नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व सुविधा देऊन नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्याचे काम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांच्याच पुढाकाराने उथळपेठ येथे अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, गायमुख या पर्यटन स्थळाचे सौंदर्यीकरण, व्यायामशाळेचे बांधकाम, माता मंदिराचा जीर्णोद्धार, सामाजिक सभागृहाचे बांधकाम, घरोघरी सौरदिवे आदी विकासकामांसह जलशुध्दीकरण संयंत्र आहे. हे गाव सर्वार्थाने आदर्श गाव म्हणून विकसीत व्हावे, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
आता येथील भव्यदिव्य आणि आकर्षक वाचनालयाने गावाच्या विकासात मोलाची भर घातली आहे. वाचनालयाच्या इमारतीसाठी २ कोटी ५० लक्ष रुपये निधी देण्यात आला. विद्यार्थी, नागरिकांच्या बौद्धिक विकासासाठी वाचनालयाची निर्मिती हा महत्वपूर्ण पुढाकार आहे. नागरिकांना महत्वाच्या सेवा देण्यासोबतच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून बौद्धिक विकास साधण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.
————
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम केंद्र सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून दुपारच्या वेळी त्यांना जीवनशैली, हलके व्यायाम आणि विरंगुळा व मनोरंजन केले जाते.
गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी बल्लारपूर विधानसभेतील पहिले जलशुध्दीकरण संयंत्र इथे बसविण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबाला वॉटर एटीएम कार्ड देण्यात आलेत. यात ते आवश्यकतेनुसार रिचार्ज करतात. यातून प्रति ५ रुपयात २० लिटर पाणी मिळते.
लगतच्या चिचाळा व सहा गावांमध्ये बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने ९० गावांमध्ये शेतक-यांचे उत्पन्न वाढले. जे.के. ट्रस्टच्या माध्यमातुन दुग्ध उत्पादनाचा प्रकल्प राबविला. रस्ते,आरो मशिन, बंदिस्त नाल्या, कृषी वाचनालय आदी विकासकामे या गावात झाली आहेत.
गायमुख येथे हेमाडपंथी व काळ्या दगडातील बांधकाम केलेले सुमारे 700 वर्ष जूने शिवमंदिर आहे. उथळपेठ येथील डोंगरातून नैसर्गिक झरे 12 महिने 24 तास सातत्याने वाहत असतात. शिव मंदिराच्या पायथ्याशी पुरातनकालीन कुंड बांधण्यात आले आहे. त्या कुंडाला गायमुखी आकार देण्यात आला असल्याने या स्थळाला गायमुख म्हणून परिसरात ओळखण्यात येते. निसर्गरम्य परिसरातील या पुरातन शिव मंदिराला दरवर्षी सुमारे 15 ते 20 हजार भाविक, नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी भेट देत असतात.
महाशिवरात्री व इतर सणांना येथे भाविकांची मोठी गर्दी होते. येथील शिव मंदिर हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध नाही तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया येथूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असल्याने देवस्थान परिसराचा सर्वांगिण विकास करणे आवश्यक आहे. गायमुख मंदीर परिसरात प्रवेशद्वार व सुरक्षा चौकी, मंदिर परिसरात ध्यान केंद्र, अंतर्गत दगडी पायवाट, गायमुख कुंड व डोंगरातून येणा-या झ-याचे नुतनीकरण, भक्तांसाठी कम्युनिटी ग्रीन किचन, तलावांचे नुतनीकरण व सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, पथदिवे व वाहनतळ, डोंगर परिसरात वृक्षलगावड ही कामे प्रस्तावित आहेत.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील जनाळा ते उथळपेठ गायमुख या परिसरात जंगल सफारीचा प्रस्ताव आहे. या परिसरात घनदाट जंगल असून तिथे वाघ, बिबट, अस्वल, हरिण व इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परिसरात तीन लहान तलाव असून तिथे वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. तसेच तिथे मचाण देखील बांधण्यात आले आहे. सुमारे 35 कि.मी. लांबीची व दीड ते दोन तास कालावधीची जंगल सफारी येथे नियोजित करण्यात आली असून अंतर्गत रस्ते बांधण्यात आले आहेत. सदर सफारी जनाळा येथून सुरू होऊन गायमुख येथे पूर्ण होत आहे. त्यामुळे या सफारीला गायमुख सफारी असे नाव देण्यात येणार आहे. या सफारीत जानाळा व गायमुख येथे प्रवेशद्वार, सुरक्षा चौकी व तिकिट घर, वाहनतळ, बगिचा व पॅगोडा, पिण्याच्या पाण्याची सोय, इको फ्रेंडली प्रसाधनगृह ही कामे प्रस्तावित आहेत.