
नागपूर -कॉंग्रेस पक्षाचा विचार स्वीकारून व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करून केवळ मतांच्या लांगूनचालनाकरिता उद्धव ठाकरे राम मंदिराच्या विरोधातील भूमिका घेत आहेत.हिंदू समाजाचा अपमान करीत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, असा कुणीतरी प्रधानमंत्री व्हावा ज्याने प्रभू रामचंद्राची स्थापना जगातील सर्वांत सुंदर मंदिरात करावी. आता, तो दिवस आला आहे. त्या दिवसावर उद्धव ठाकरे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील हिंदू समाज देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती टिकविणारा आहे, त्याला डिवचण्याचे काम ठाकरे करीत आहेत. श्रीराम मंदिराचे श्रेय कधीच पतंप्रधान मोदी किंवा भाजपाने घेतले नाही. या देशातील जनतेची भावनिक मागणी पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात व आता रामंदिराच्या विरोधात घेतलेली त्यांची भूमिका केवळ मतांच्या लांगूनचालनाकरीता आहे. जेव्हा व्यक्तिचा ऱ्हास होतो, तेव्हा मीडियाची स्पेस घेण्यासाठी वक्तव्ये केली जातात. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात दीड लक्ष मंदिरात कार्यक्रम
दरम्यान, सुमारे ५२७ वर्षांनंतर अयोध्येत प्रभूरामचंद्राचे भव्य मंदिर साकारले जात आहे. जगातील सर्वांत मोठी दिवाळी २२ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात दीड लक्ष मंदिरात अयोध्येत श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्याचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.