दोन अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

0

 

सीबीआयच्या ताब्यात दोन लाचखोर अधिकारी 2.15 कोटी जप्त

(Nagpur)नागपूर – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने (CBI) लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारच्या ‘पेसो’ (Petroleum and Safety Organization) मधील दोन अधिकाऱ्यांना आज गुरुवारी नागपुरात अटक केली आहे. याप्रकरणी आणखी दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले असून सीबीआयने अटक केलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली असता 2 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआयने नागपुरातील सेमिनरी हिल्स येथील ‘पेसो’ कार्यालयाजवळ असलेल्या एका टायपिंग सेंटरवर हा सापळा रचला. राजस्थानच्या चित्तोगडमध्ये असलेल्या एका स्फोटक कंपनीत तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरची निर्मिती क्षमता वाढवून देण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी मोठी लाच घेतल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने नागपूर शहरातील इतरही काही ठिकाणांवर छापे घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळल्याने लक्ष्मीनगर येथील प्रियदर्शन दिनकर देशपांडे आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवी सिंग कछवाह यांनाही अटक करण्यात आली. प्रियदर्शन देशपांडे हे ‘पेसो’मधील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. त्यांच्या लक्ष्मीनगर येथील घरातून सीबीआयच्या पथकांनी 1 कोटी 25 लाख रुपये जप्त केले. दुसरीकडे राजस्थान येथील रहिवासी देवी सिंग कछवाह यांच्याकडूनही 10 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.