
सांगली SAGALI : पंतप्रधान मोदी यांना हरविण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, आम्ही सर्व पैलवानांना चितपट करु. राज्यात वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी १२ जागांचा प्रस्ताव दिलाय. चारही पक्षांनी बारा-बारा जागा घ्याव्या, मग आम्हीही तुमचे बारा वाजवतो, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रत्येकी १२ जागा लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
त्यावर बोलताना आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गरज महाराष्ट्रातच असून त्यांनी दिल्लीत येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. आपण स्वतः शिर्डीमधून निवडणूक लढवू इच्छित असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यावर बोलताना आठवले म्हणाले, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील, असे वाटत नाही. अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे. प्रकाश आंबेडकर सक्षम नेते आहेत. ते महायुतीसोबत येणार नाहीत, पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले.
एनडीएमधून आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ आणि ४०० पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही. रिपब्लिकन पक्षाला २ तरी जागा द्याव्यात, ही माझी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद मिळावे, त्यासाठी विस्तार करण्याची आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.