

नवी दिल्ली : (New Delhi:)भारतातील भांडवली बाजारांची नियंत्रक संस्था असलेल्या सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती आगामी वर्षांच्या कार्यकाळासाठी असणार आहे.
सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधुरी पुरी बुच यांचा सध्याचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने तुहिन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. तुहिन पांडे हे यापूर्वी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयात अर्थसचिवपदावर कार्यरत होते.
देशाचे अर्थ तसेच चलनविषयक धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तुहिन हे १९८७ सालच्या ओडीशा बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. वित्तसचिवपदी नियुक्ती होण्याआधी त्यांनी सार्वजनिक उपक्रम विभाग, तसेच महसूल खात्यात देखील सेवा प्रदान केली आहे. अर्थमंत्र्यांकरिता विविध महत्वाच्या विषयांसाठी सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी संसदेच्या लोकलेखा समितीत अर्थमंत्रालयाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय भांडवली बाजार नियंत्रक असेलेल्या सेबीच्या सध्याच्या अध्यक्षा माधुरी पुरी बुच यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत असल्याने केंद्रीय कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने याआधीच यापदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आता तुहिन यांची नियुक्ती होऊन आता ते पदभार सांभाळतील. तुहिन यांची ही नियुक्ती पुढील तीन वर्षांच्या काळासाठी असणार आहे. लवकरच केंद्र सरकारकडून त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्रक जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
भांडवली बाजाराचा सध्या तेजी मंदीच्या हेलकाव्यात प्रवास सुरु आहे. त्यातून मार्ग काढत गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करणे हे सेबीचे प्रमुख म्हणून तुहिन यांच्यासमोरचे आव्हान असणार आहे.