

मुंबई(Mumbai), 9 जुलै :- मुंबईत आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचे बिल्डर लोकांचे रॅकेट असल्याचा आरोप आमदार प्रवीण देकर(Pravin Dekar) यांनी आज विधानसभेत केला.अधिकारी आणि भुमाफियांच्या संगणमताने आदिवासींच्या जमिनी हडप करून तेथे टोलेगंज टॉवर उभे करायचे, हा आदिवासी बांधवांवर अन्याय असून यासंदर्भात शासन चौकशी समिती नेमून कारवाई करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात चर्चेवेळी उपस्थित केला.
आज सभागृहात सदस्य आमशा पाडवी यांनी आदिवासींच्या जमिनीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्या चर्चेत सहभागी होत दरेकर म्हणाले की, संबंधित अधिकारी आणि भुमाफिया यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
मुंबईत आदिवासींच्या जागा हडप करण्याचे बिल्डर लोकांचे रॅकेट आहे, असा आरोप त्यांनी केला. आदिवासींच्या जागा हडप करायच्या, कागदपत्र बनवायची आणि तेथे टोलेगंज टॉवर उभारल्या जातात.आदिवासींकडे कोर्टात जायलाही पैसे नसतात, बिल्डर मोठे वकील ठेवतात त्यामुळे मुंबईतील आदिवासींवर अन्याय होत असल्याचे दरेकर म्हणाले.
यावेळी दरेकरांनी कांदिवली येथील आदिवासी महिलेचेही उदाहरण सभागृहात सांगितले. तसेच मुंबईतील आदिवासींच्या ज्या जागा आहेत त्या मूळ कुणाच्या होत्या, त्या कुणी घेतल्या आहेत का? यासंदर्भात चौकशी समिती नेमून कारवाई करणार का? असा सवाल दरेकरांनी केला. दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुंबईत आदिवासींच्या जमिनी खोटे दस्तावेज करून, दडपशाहीने, अधिकाऱ्यांना हाताशी धरून आदिवासी बांधवांची फसवणूक करून या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
कोकण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून अशी प्रकरणे घडली असतील तर एक महिन्याच्या आत चौकशी करून शासन स्तरावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.