

1000 वाहन चालकांना प्रशिक्षित करणार
नागपूर:अधिकाधिक अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. शारीरिक व मानसिक नियंत्रण, ओव्हरटेक करताना, लाईन बदलताना काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात. गाडीवर, मनावर नियंत्रण कसे ठेवावे, यावर जनआक्रोशतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘डिफेन्सिव ड्रायव्हिंग’ अभ्याक्रमाचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ च्या 1000 चालकांना देण्यात येणार आहे.
धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे जनआक्रोशतर्फे तयार करण्यात आलेल्या देशातील एकमेव अशा ‘डिफेसिंव्ह ड्रायव्हिंग’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन नुकतेच महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड, सचिव रवींद्र कासखेडीकर यांची प्रमुख उपस्थितीत पार पडले. दर गुरुवार व शुक्रवार प्रत्येकी पन्नास चालक ‘डिफेंसिव ड्रायविंग’ चे प्रशिक्षण घेतील, अशी माहिती प्रास्ताविकातून रविंद्र कासखेडीकर यांनी दिली.
‘आपली बस’ चे चालक हे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून ते दररोज हजारो प्रवाशांची ने-आण करत असतात. त्यामुळॆ त्यांच्यावर मोठी जबाबदारी मोठी आहे, असे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी डिफेंसिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले. जनआक्रोशच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. श्रावण हर्डीकर यांनी, प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वाहतूक शहराचा कणा आहे असल्याचे सांगितले. डॉ. विकास महात्मे यांनी, महात्मे नेत्र रुग्णालयामध्ये आपली बसचालकांसाठी निःशुल्क नेत्र तपासणी करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी तर आभार प्रदर्शन जनआक्रोशाचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड यांनी केले.